पाषाणहृदयी : -- हिंदू आणि मुस्लीम दंगलीचा धुरळा खाली बसला होता.......

साधा माणुस...

“ पाषाणहृदयी...” 
दंगलीचा धुरळा खाली बसला होता....! 
तणाव निवळून शहरी जीवन पुन्हा नव्याने पण जुन्याच जखमा अंगावर घेऊन सुरु झाले होते.. !!!
न्यायालयाने दिलेल्या निकाला नुसार - 
"मंदिर आणि मस्जिद एकमेकांना लागुनच परंतु प्रवेशद्वार विरुद्ध दिशेला"   असे बांधायचे ठरले होते आणि दोन्ही कडून जोरदार सुरुवात झाली होती...!!
एक भला थोरला पाषाण मंदिराच्या कामात वापरण्यासाठी छन्नी हातोड्याचे मर्मभेदी गाव अंगावर झेलत शांतपणे सर्व परिस्थिती पहात होता.. 
इतर लहान लहान पाषाण त्या मानाने घाव सहन करू शकत नव्हते आणि खिन्न आवाजात ते विव्हळत  होते.. आसुसलेल्या नजरेने थोरल्या पाषाणाकडे पहात होते.. 
त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत होते..
हळूहळू, एक एक करीत अवाढव्य विशाल पाषाण मंदिराच्या चौथा-यासाठी, मस्जीदिच्या भिंतीसाठी, मिनारच्या चौथा-यासाठी, मंदिराच्या दार्शनिक भागासाठी आणि सुंदर शिल्पाकृतीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देत होते.. 
तो थोरला पाषाण सर्वांना धीर देत होता.. , 
" बाबांनो .., टाकीचे घाव खाल्ल्याशिवाय देवपण येत नाही..! 
जरा धीर धरा... थोडी कळ काढा.. ..  " 
"लवकरच काही दिवसांत आपले हाल संपतील.. 
...आणि लोक आपल्यातून साकारलेल्या शिल्पांना.... कला कुसरीला मोठ्या प्रेमाने पहायला येतील... 
...मूर्तीला भक्तीभावाने नमस्कार करतील ....नतमस्तक होतील..
दुसरीकडे त्याच प्रेमळ श्रद्धेने मस्जिद मध्ये अल्लाह ची करुणा भाकतील, त्याची उपासना करतील.....!"
परंतु ते त्या छोट्या छोट्या दगडांना पटत नव्हते..!
कारण...
जे भीषण वास्तव काही काळापूर्वी त्यांनी पहिले होते .. ते दगडांचा सुद्धा थरकाप करणारे होते..!!!!
क्रूर हत्याकांडात ज्या निर्दयतेने निष्पाप कोवळ्या जीवांना मारण्यात आले होते..!!!!
दंगलीत दोन्हीकडच्या स्त्रिया आणि लहान मुलांना, कोवळ्या जीवांना मारण्यात आले होते.. !!! 
ते आठवून त्या दगडांना सुद्धा पाझर फुटला होता..!
या माणसांनी एकमेकांचा जीव घेऊन काय मिळवले होते कुणास ठावूक..?     
असा क्रुर,  निर्दयी माणूस त्यांच्या आठवणीमधुन जाउच शकत नव्हता..!!

आणखी सहा महिन्यांनी मंदिर आणि मस्जिद चे बांधकाम पूर्ण झाले आणि ते नागरिकांना उपासनेसाठी खुले केले गेले..!!! 
थोरला पाषाण जे म्हटला होता अगदी तसेच घडत होते..!!
मंदिर आणि मस्जीद ... दोन्ही कडे लोकांची रीघ लागली होती...
भक्ती रसाने ओथंबून आलेले लोक दिसत होते...
आत्मिक शांती साठी...
स्वताच्या समाधानासाठी...
नवस बोलण्यासाठी.. 
लोकांची रीघ लागली होती..!!
मंदिर आणि मस्जीद चे प्रवेशद्वार विरुद्ध दिशेला जरी असले तरी दोन्हींची मागील बाजू एकमेकांना अगदी खेटून होती.. 
माणसांच्या मनाप्रमाणे त्या दगडांमध्ये दुजाभाव नव्हता..! 
ते एकमेकांना आलिंगन देऊन एकमेकांत घट्ट मिसळून गेले होते.. 
कारण....त्यांना माहित होते ....
कि त्यांच्यातील अभेद्यपणा हा त्यांच्यामधील विश्वासावर, प्रेमावर आणि आपलेपणावर आधारित होता.. 
आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्या दगडांमध्ये नव्हता..! 
दांभिकतेचे देखणे रूप नव्हते..
द्वेष, वैर नव्हते..
 शिवाय खोट्या प्रतिष्ठेचा मोठेपणा नव्हता..
आणि तो मिरवण्याची घाणेरडी मानवी हौस देखील नव्हती..
येउच शकत नव्हती...
मंदिर आणि मस्जिद चे दगड असूनही एकमेकांमध्ये घट्टपणे मिसळले होते, एकरूप झालेले होते ... 
आणि म्हणूनच ....
म्हणूनच ते "अभेद्य" होते..!  
आणि लोकांमध्ये .?????
त्यांच्या लेखी मंदिर मस्जिद च नाही तर आपसातील नात्यांमध्ये सुद्धा भेद होता.. 
मनामनातुन दुस-याप्रती दुजाभाव होता..
सर्वच लहान मोठी दगड आता मोहक रूप घेऊन सुंदर शिल्पकृती बनून मंदिर मस्जिद वर स्थिरावली होती.. 
ते सर्व थोरल्या पाषाणाला विचारीत होती.. 
"हे थोरल्या पाषाणा....! 
या लोकांनी तुझी प्रतिस्थापना केली..
मंदिरात येणारे लोक तुला भक्तीने प्रेमाने पूजतात
आमचा गुरु सुद्धा तूच आहेस..!..
   ...तूच आम्हाला सांग.. कि इतक्या प्रेमाने तुझ्यासमोर नतमस्तक होणारे लोक ...
तिकडे मस्जिद मध्येसुद्धा प्रसन्नतेने, एकाग्रतेने नमाज पढणारे लोक...
 अचानक का एकमेकांवर हत्यार उचलतात..???
क्षुल्लक कारणांसाठी एकमेकांचा जीव घेतात..???
सुशिक्षित शिकलेले लोक, काही मुठभर लोकांच्या चिथावणीला असे बळी पडतात ..????
का हे असे वागणे शिकल्या सावरल्या लोकांचे..????
का इतकी निर्दयता..??? 
मंदिर आणि मस्जीदइतके जवळ असून मनाने हे लोक एकमेकांपासून कित्येक शतक दूर जावेत..?
आम्ही दगड असूनही जो "अभेद्य" राहण्याचा आत्मभाव आम्हाला कळला.. तो या लोकांना केंव्हा कळणार..????

याचे उत्तर त्या थोरल्या पाषाणाकडे .......
.....म्हणजेच त्या "शंभू महादेवा" कडे ही नव्हते... ...!!!!!!
....तो देखील या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी खिन्नपणे...
....शुन्यात नजर हरवून बसला होता..!!!! 
______________________________