हिंदू असोत कोणी, कोणी असोत मुस्लीम....

साधा माणुस...
हिंदू असोत कोणी, कोणी असोत मुस्लीम....
..

वणव्यात पेटलेली, वस्ती अजून बाकी,
जाळून पीळ गेला.... रस्सी अजून बाकी..!

हिंदू असोत कोणी, कोणी असोत मुस्लीम,   
दोस्ती उजाड झाली, बस्ती अजून बाकी..! 

रामो रहीम नाही, जातीयतेत काही,
पण  'राज' कारण्यांची, कुस्ती अजून बाकी..!

सांधावयास सारे, आयुष्य वाहिले मी,
माया जगात का ही, सस्ती अजून बाकी..?

सारे दुभंगलेले, उध्वस्त मोडलेले,
जोडेन मी पुन्हा ते, हस्ती अजून बाकी..!

माणूसकी जपाया, बांधून सर्व जखमा,
हा मी उभा पुन्हा बघ, मस्ती अजून बाकी..!!


----
~जमीर इब्राहिम "आझाद"